केळी घडाची गुणवत्ता सुधारण्यासाठीचे उपाययोजना👇
1- फण्यांची विरळणी करणे आवश्यक असते- केळी फळाच्या आकारमानामध्ये चांगले बदल करून येण्यासाठी घड लवकर परिपक्व होणे खूप गरजेचे असते.
यासाठी फण्याची योग्य वेळी विरळणी करणे गरजेचे आहे. केळीच्या काही वानांमध्ये घडाला नऊ पेक्षा जास्त फण्या येतात. त्यामुळे अशा जास्त फण्या राहिल्या तर सर्वांना योग्य पोषण घटक न मिळाल्याने त्यांचे आकारमान एकसारखे राहत नाही व दर्जा ढासळतो.
यासाठी एक घडावर सहा ते आठ फण्या ठेवून बाकीच्या विळ्याच्या साह्याने व्यवस्थितपणे कापून टाकणे गरजेचे आहे. यामुळे फळे एकसारख्या आकाराची येतात.
2- जमिनीची मशागत- केळीच्या बागेतील जमीन वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असून ती कायम ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.
केळी बागेतील जमिनीची मशागत लागवडीनंतर तीन चार महिन्यात सुरू करणे गरजेचे असून या कालावधीत कोळपणी देऊ शकतात.
परंतु त्याच्या पुढे हाताने चाळणी करण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जातो. झाडाला थोडीशी उंच भर ठिबकसाठी करावी.
या भरीचा फायदा हा वाऱ्यापासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी होतो.
3- बुंध्यालगतचे उपठोंब काढणे- बऱ्याचदा केळीच्या झाडाच्या बुंध्याला उपठोंब येऊ लागतात व ते वेळोवेळी काढणे गरजेचे आहे. त्यामुळे रोपाला संरक्षण मिळते.
हे ठोंब काढण्याचे काम झाडाला फुले येईपर्यंत करणे गरजेचे आहे.
केळीमध्ये जर मिश्र पिकांची लागवड करायची असेल तर त्यांची निवड करताना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्यांचा पुरवठा इत्यादी बाबींची खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
खासकरून केळी बागेला करायचा अन्नद्रव्यांचा पुरवठा इत्यादी बाबींचा विचार करून केळीला मोहोर आल्यावर अशी पिके घ्यावीत. यामध्ये लक्षात घ्यावे की आंतर पिके ही मोहराच्या विरुद्ध दिशेने हवीत व पिकापासून दूर असावी.
4- केळफुल कापणे आहे गरजेचे- जेव्हा केळीची पूर्ण निसवन होते तेव्हा सर्व फण्या केळ कमळातून तून बाहेर पडतात. दोन ते तीन दिवसात खाली उमलणारे केळफुल धारदार विळाच्या साह्याने व्यवस्थित कापून घ्यावे.
त्यामुळे केळफुलाला अनावश्यक होणारा अन्नपुरवठा हा वाढणाऱ्या घडास मिळतो घडाच्या उत्तम वाढीस मदत होते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केळ फुलांमध्ये आसरा घेणाऱ्या रेड रस्ट थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
5- नरकळ्या खुरडून टाकणे- नरकळ्या काढून टाकल्यामुळे घडावरील फळ वाढण्यासाठी मदत होते आणि फांदीचे वजन वाढते.
त्यामुळे या नरकळ्या एक दोन हात लांबीवर एका बोटाचे अंतर ठेवून कापून टाकने महत्वाचे आहे.