Ginger Farming : शेतकरी लक्ष्मण काळे यांची अद्रक थेट दुबईच्या बाजारपेठेत.


खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून

तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खुलताबाद शहरातील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी पारंपारिक पीकांना फाटा देत अद्रकचं उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला.

पुढे त्यांनी अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरु ठेवले आणि आज त्यांच्या अद्रकला दुबईच्या बाजारपेठेत मागणी आहे.

काळे यांनी नुकतीच हरियाली फाउंडेशनच्या माध्यमातून 200 क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरमध्ये लोड करून 19 नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली होती.

दुबईला पाठविण्यात आलेल्या त्यांच्या अद्रकला 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.

तर खुलताबादच्या स्थानिक बाजारात त्यांना 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता.

त्यामुळे दुबईला गेलेल्या अद्रकला त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 400 रुपयांचा अधिक भाव मिळाला आहे.

अद्रकीच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकीच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त आहे.

त्यांच्या अद्रकीचा कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकीची मागणी जास्त असते.

यामुळेच लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचं त्यांनी सांगितले.