Wheat water management : असे करा गहू पिकाचे पाणी नियोजन व करा उत्पन्नात वाढ


ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये, पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी म्हणजेच मुकुट वाढ अवस्थेत ओलीताच्या वेळी युरीया खत प्रती ५० किलो प्रति हेक्टर द्यावे.

गहू पिकाला पुढील महत्वाच्या अवस्थांमध्ये ओलीत करावे.

* मुकुट मूळ फुटवे अवस्था – लागवडीनंतर १८ ते २० दिवस

* मशागतीची अवस्था – ३० ते ३५ दिवस

* फुलोरा अवस्था – ६५ ते ७० दिवस

* दाणे भरण्याची अवस्था – ८० ते ८५ दिवस

* दाणे परीपक्वता अवस्था – ९५ ते १०० दिवस


ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे.

पाणी अपुरे असल्यास व एक ते तीन पाणी देणे शक्य असल्यास ते पुढील प्रमाणे दयावे.

एकच ओलीत उपलब्ध असल्यास ४० ते ४२ दिवसांनी तर

दोन ओलीत उपलब्ध असल्यास १८ ते २० व ६० ते ६५ व्या दिवशी पाणी द्यावे.

चांगल्या उत्पादनासाठी तीन ओलीत उपलब्ध असल्यास १८ ते २०, ४० ते ४२ व ६० ते ६५ व्या दिवशी पाणी द्यावे.

बागायती गव्हाची उशिरा पेरणी

उशिरा पेरणीसाठी बागायती गव्हाची पीडीकेव्ही सरदार, एकेएडब्ल्यू ४२१०-६, एकेएडब्ल्यू ४६२७, एकेएडब्ल्यू १०१७ (पूर्णा) एकेडब्ल्यू-३८१, एचआय ९७७ या शिफारस केलेल्या वाणाची निवड करुन १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत पेरणी आटोपावी.

पेरणी अगोदर पीएसबी अधिक अझॅटोबॅक्टर प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि व्हियाव्हॅक्स (७५ टक्के डब्ल्यू पी) प्रति २.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे सह बीजप्रक्रिया करावी.

रासायनिक खते ४० : ४० : ४० किलो नत्र : स्फुरद : पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत व ४० किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी पहिल्या ओलितासोबत द्यावे.